३२ लाखांच्या ट्रकचा अपहार करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी…

लोणी काळभोर : भारतीय सेनेमधून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचा ३२ लाख रुपये किंमतीचा ट्रक विकत घेण्याचे आमिष दाखवून त्याचा अपहार केल्याप्रकरणी एका ठगास अटक करण्यात आली आहे. केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी विश्वास शंकर हरिहर (वय ५१, रा. फ्लॅट नंबर ०४, पहिला मजला, शिवसृष्टी अपार्टमेन्ट, रुई, बारामती ता. बारामती जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश विश्वनाथ बोरकर (रा. संगाई निवास, पांडवदंड रोड, वाकवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, विश्वास हरिहर हे भारतीय सेनेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी निवृत्ती नंतर व्यवसायासाठी टाटा कंपनीची सोळा चाकी ट्रक खरेदी केला होता. यासाठी त्यांनी २८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.परंतु, दररोज भाडे मिळत नसल्याने त्यांनी ट्रक विकण्याचा निर्णय घेतला. ते ट्रक विकत घेण्यासाठी ग्राहक शोधत होते. ५ जुलै २०२३ रोजी त्यांना बोरकर याचा फोन आला. व ट्रक खरेदी संदर्भात भेटायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघेही भेटले. तेव्हा त्यांच्यामध्ये ट्रक विक्रीचा व्यवहार ३२ लाख २५ हजार रुपयांना ठरला.
त्यानंतर अविनाश बोरकर यांनी हरिहर यांना फोन पे व्दारे ९० हजार व एनईएफटीद्वारे ९८ हजार रुपये पाठवले. तसेच ट्रक विक्री व्यवहारापोटी १ लाख ३ हजार ६० रुपयांचा धनादेश हरिहर यांना दिला. यांमुळे हरिहर यांनी बोरकर यांच्यावर विश्वास ठेवून ट्रक दिला. परंतु, यापुढे तीन महिने कर्ज वापरण्याकरीता द्या, त्यानंतर सदरचे कर्ज माझे नावावर ट्रान्सफर करुन घेतो असे बोरकर यांनी सांगितले. सदरचा व्यवहार करतेवेळी बोरकर यांना ट्रकचे हप्ते महिन्याला वेळेवर भरणे व तीन महिन्यांमध्ये ट्रक कर्जासहित त्यांच्या नावे करुन घेण्याबाबत अट देखील घातली होती. व सदर अटी पुर्ण नाही झाल्या तर ट्रक पुन्हा घेवुन जाणार. असा सरकारमान्य नोटरी करुन व्यवहार पुर्ण झाला होता.
बोरकर याने ट्रकच्या कर्जाचे पहिले सहा हप्ते नियमित भरले. परंतु फेब्रुवारी, २०२४ नंतर त्यांनी आजअखेर एकही हप्ता भरला नाही. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी हरिहर यांनी बोरकर यांना वेळोवेळी विनंती केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. बोरकर फोन उचलला नसल्याने हरिहर त्यांच्या घरी गेले. तेव्हा बोरकर त्यांना ट्रकचे हप्ते भरणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, मी तुमचा ट्रक माझ्या कामानिमित्त ओडीसा राज्यामध्ये पाठविला असुन तो यापुढे तुम्हाला कधी मिळणार सुध्दा नाही. तु पुन्हा माझ्या दारात पुन्हा आला तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
यानंतर हरिहर यांनी बोरकर यांची माहिती घेतली असता असे समजले की, तो काहीएक काम धंदा करीत नसुन त्याने लोणी काळभोर गाव व इतर गावामधील अनेक लोकांची अश्याच प्रकारे फसवणुक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरिहर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी बोरकर याला काही तासांच्या आत अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड ठोठावली आहे.
ही कामगिरी पुणे शहर पोलीस उपयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पूजा माळी, पोलीस हवालदार दादा हजारे, निलेश कोल्हे, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.