उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का? फुटीर खासदारांच्या गटाचे नेतृत्व संजय (बंडू) जाधवांकडे जाण्याची शक्यता

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली असून सहा खासदारांच्या कथित बंडानंतर पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाने सर्व नऊ खासदारांची तातडीची बैठक बोलावून व्हिप जारी केला होता. मात्र, सहा खासदारांनी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने पक्षातील फूट अधिक स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या घडामोडींनंतर बंडखोर खासदारांच्या गटाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्याकडे या गटाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फुटीर खासदारांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे स्थापन केला जाऊ शकतो. त्याचवेळी गटनेत्याच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या गटाचे नेतृत्व संजय जाधव करणार असून ते सहा खासदारांमधील समन्वयक आणि प्रमुख चेहरा असतील. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, या प्रकरणावरून कालच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे दावे केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांना गटाचा ‘कॅप्टन’ तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना ‘व्हाईस कॅप्टन’ म्हणून पुढे केले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर घडलेल्या राजकीय हालचालींमुळे चित्र बदलल्याचे दिसत आहे.

सध्या शिवसेना ठाकरे गटासाठी ही परिस्थिती मोठे आव्हान मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खासदारांमधील नाराजी उघड झाल्याने नेतृत्वासमोर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. आगामी काही दिवसांत फुटीर खासदारांची भूमिका, स्वतंत्र गटाची अधिकृत घोषणा आणि त्यावरील ठाकरे गटाची प्रतिक्रिया याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.