तापमानात मोठी वाढ; मार्च महिना ठरला जगात सर्वांत उष्ण
नवी दिल्ली : सध्या तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. जागतिक तापमानवाढीवर हवामान बदलाचा मोठा परिणाम झाला आहे. मार्च महिना जगात सर्वांत उष्ण महिना ठरला आहे. मागील १० महिन्यांपासून प्रत्येक महिन्यात नवीन तापमानाचे विक्रम प्रस्थापित होत आहेत. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस या हवामान संस्थेकडून अहवाल देण्यात आला आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या १२ महिन्यांच्या कालावधीतदेखील सर्वात उष्ण असा काळ होता, अशी माहिती या अहवाल देण्यात आली.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक सरासरी तापमान पूर्व औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा १.५० अंश सेल्सिअस खाली ठेवणे अपेक्षित होते. मात्र, मागील एका वर्षातील कालावधीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत जागतिक सरासरी तापमान १८५०-१९०० या पूर्व-औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा १.५८ अंश सेल्सिअस जास्त होते.
जागतिक स्तरावर अनेक संस्थांकडून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने दीर्घकाळ तापमानवाढीचा ट्रेंड दिसत असल्याने हवामान बदल वेगाने होत असल्याचे चित्र दिसत आहे. २०२३ हे वर्ष जागतिक स्तरावर सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली होती. आता पुन्हा तोच तापमानवाढीचा ट्रेंड कायम दिसत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा हा ४० अंशाच्या आसपास गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे तर काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान बदलाचा मोठा फटका
जग सरासरीने अधिक उष्ण होत असताना या तापमान वाढीमुळे विरोधाभासी परिणाम होऊ शकतात. यामध्ये वारंवार तीव्र हिमवादळे तयार होणे, वातावरणातील बदल अनेक मोठ्या मार्गांनी जगावर परिणाम करू शकतात, त्यातीलच एक म्हणजे बर्फ वितळवणे, महासागरांचे संतुलन बिघडणे यावर हवामान बदलाचा मोठा परिणाम होतो.