पुरंदर विमानतळ परिसरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार बंद! जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय..

पुरंदर : येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने बाधित क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील जमिनींच्या व्यवहारांवर निर्बंध आणण्यासाठी अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
येथील भूसंपादनाला दोन वर्षे विलंब झाला असला, तरी या परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ झाली आहे. यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन कार्यपद्धतीबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत प्रकल्प क्षेत्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले असल्याचे पुरंदर विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले.
यामुळे अंतिम अधिसूचना काढून खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर निर्बंध आणण्यासाठी सूचना केल्या असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव-मेमाणे, कुंभार वळण, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या गावांची चार टप्प्यांत विभागणी करून चार महसूल अधिकारी भूसंपादनासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत.
याबाबत विमानतळ प्रकल्पाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मोजणीसाठी अक्षांश-रेखांश निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘एमआयडीसी’ खासगी संस्था नियुक्त करून वेगाने कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले केले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून येथील प्रस्तावित विमानतळासाठी ३३०० सर्वे क्रमांकातील सुमारे २८३२ हेक्टर जमीन राखीव करण्यात आली आहे. यामुळे कामाला गती मिळाली असून हे विमानतळ होणार की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर आता याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. जमिनीसह रस्ते ,पानंद, ओढा, यासाठी त्याच्या सर्वे क्रमांकासह वेगळी माहिती देण्यात आली आहे.
पुरंदरचे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून नावारूपाला येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला सांगितले आहे. असे असले तरी अर्थसंकल्पात त्यावर काहीच तरतूद दिसत नाही असे आमदार विजय शिवतारे यांनी निदर्शनास आणून दिले होते.