पुरंदर विमानतळासाठी आता संपादनासाठी जमिनीची कपात होणार, केवळ १२८५ हेक्टर क्षेत्र संपादित होणार..

पुरंदर : येथील विमानतळाच्या भूसंपादनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर अखेर संपादनासाठी जमीन कमी करण्यात आली आहे. पूर्वी हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर केले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, भूसंपादनास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना चारपट मोबदल्यासह जमिनीचा परतावा देण्यात येणार आहे. यासाठी एरोसिटीत १० टक्के विकसित भूखंड दिला जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयासह सासवड येथील पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयातही या संमती स्वीकारण्यात येतील. संमतीने देणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ चारपट मोबदलाच देेण्यात येईल.
आता गावनिहाय संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचे क्षेत्र येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे माहिती दिली आहे. या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांतील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार, अशी घोषणा केली होती.

त्यानुसार २४ एप्रिल रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली होती. यात १३ हजार ३०० शेतकरी बाधित होणार होते. त्यानंतर या भूसंपादनाला विरोध केला होता. योग्य मोबदला आणि पुनर्वसन करावे या मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात होत्या. त्यानंतर सरकारने या प्रकल्पासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना १० टक्के विकसित भूखंड आणि चार पट मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच या शेतकऱ्यांना विविध फायदे देण्यात येतील, असे सांगितले होते. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे क्षेत्र कमी करण्याबाबत सुतोवाचही केले होते. तरीदेखील बाधित शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. त्यांच्यासाठी अन्य ठिकाणी शेती आणि घरांची व्यवस्था करण्यात येईल. शक्यतो हे पुनर्वसन आहे, त्याच ठिकाणी करण्याचा विचार आहे.
योग्य मोबदला दिला जाईल, त्यांना वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले होते. आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हे क्षेत्र कमी करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आता साधारण १ हजार २८५ हेक्टर एवढ्या क्षेत्राचे भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू यांनी डुडी यांना दिले आहेत.