१० लाखांत सोन्याची भलामोठी माळ घेतली; घरी नेल्यावर सत्य समोर आलं, पुण्याच्या तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली

पुणे : पितळेच्या माळेला सोन्यासारखी पॉलिश करून ती अस्सल सोन्याची असल्याचं भासवत एका तरुणाची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रावेत परिसरात समोर आला आहे. मुकाई चौक ते रावेतदरम्यानच्या बी.आर.टी. रोडवरील पदपथावर हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
सोन्याचं आमिष दाखवत १० लाख उकळले
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२६ ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपींनी तुकाराम शिवाजी राठोड (वय २७, रा. जनता वसाहत, पर्वती) यांना सोन्याची माळ असल्याचं सांगितलं. पितळेच्या माळेला हुबेहूब सोन्यासारखी पॉलिश करून आरोपींनी ती खरी असल्याचा विश्वास निर्माण केला.

सोनं स्वस्तात मिळत असल्याचं आमिष दाखवत आरोपींनी तुकाराम यांच्याकडून तब्बल १० लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांच्या हातात पितळेची माळ देण्यात आली.


मात्र, माळ सोन्याची नसून पितळेची असल्याचं लक्षात येताच तुकाराम यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तुकाराम राठोड यांनी १ सप्टेंबर रोजी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजू प्रजापती (वय ३५), त्याचा भाचा आणि त्याची बहीण अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बनावट सोन्याच्या माळेचं आमिष दाखवून तरुणाची १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या या प्रकरणाचा रावेत पोलीस अधिक तपास करत आहेत.