अखेर न्याय मिळाला! नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशी…

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे (वय 65) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सोमवारी हा ऐतिहासिक निकाल दिला.

यापूर्वी 25 जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाची आणखी एक विशेष बाब म्हणजे, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लागला. त्यामुळे अत्याचार आणि खून प्रकरणातील राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे.

सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाचे 12 महत्त्वाचे निकाल न्यायालयासमोर सादर केले. या सर्व प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व हत्या यांसारखे गंभीर गुन्हे असून, अनेक प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यायालयाने गुन्ह्याचे भीषण स्वरूप, पीडितेचे अल्पवय, आरोपीने दाखवलेली अमानुष क्रूरता आणि समाजावर होणारा परिणाम या बाबींचा विचार करून हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ श्रेणीत मोडत असल्याचे मान्य केले आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.