पुण्यात लॉजवर राहणं होणार कठीण, आता नियम बदलले; पोलिसांच्या नव्या सूचना जारी, जाणून घ्या..

पुणे : पुणे शहरात लॉजमध्ये थांबणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी पुण्यातील लॉज मालक आणि चालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लॉजवर सहजपणे रुम मिळवणं कठीण होणार आहे.
विशेषत: हडपसर परिसरातील लॉजवर ही कारवाई सुरू झाली असून, हळूहळू ती शहरभर लागू होण्याची शक्यता आहे. पुण्यातील हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत नुकतीच लॉज मालक व चालक यांची बैठक घेण्यात आली आहे.
दरम्यान, यामध्ये पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या की, कोणत्याही ग्राहकास रुम देण्यापूर्वी त्यांची सखोल शहानिशा करणे आवश्यक आहे. ग्राहकाचे ओळखपत्र, पत्ता व इतर वैध कागदपत्रांची नोंद रजिस्टरमध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लॉजमध्ये परदेशी नागरिक राहत असल्यास, त्यांच्याकडून सी-फॉर्म भरून घेणे, पासपोर्ट आणि व्हिसाची छायांकित प्रत ठेवणे अनिवार्य आहे. या सर्व दस्तऐवजांची योग्य रजिस्टरमध्ये नोंद ठेवली जाणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांच्या सूचनेनुसार, लॉज परिसरात HD आणि नाईट व्हिजन कॅमेरे बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. लॉजच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व बाजूने कॅमेऱ्यांच्या नजरेखाली येणारी सुरक्षा यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जर लॉजमध्ये कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास, तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला संपर्क साधण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे पुण्यात तुम्ही लॉजमध्ये राहणार असाल तर तुम्हाला या नियमाचे पालन करावे लागणार आहे.