‘शरद पवार संस्थापक, पण मालक नाही!’ उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत; काही वेळातच केली डिलीट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केल्याचे वक्तव्य केले.
त्यानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. विशेष म्हणजे, चर्चेत आल्यानंतर ही पोस्ट काही वेळातच डिलीट करण्यात आली.

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी ‘संस्थापक’ आणि ‘मालक’ या दोन संकल्पनांमध्ये फरक असल्याचे स्पष्ट केले. ‘संस्थापक असणे आणि पक्षाचा तहहयात मालक असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत,’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा रोख थेट शरद पवारांकडे असल्याची चर्चा सुरू झाली.


राजकीय पक्षाची तुलना घर, जमीन, कंपनीतील शेअरहोल्डिंग किंवा वारसाहक्काने मिळणाऱ्या खासगी मालमत्तेशी करता येणार नाही, असा मुद्दा उमेश पाटील यांनी मांडला. पक्षाची घटना, सदस्य, संघटनात्मक रचना आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार राजकीय पक्षाचे कामकाज चालते, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसपासून टीडीपीपर्यंत उदाहरणांचा दाखला
आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ उमेश पाटील यांनी काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष, डीएमके, एआयएडीएमके आणि तेलुगू देसम पक्षाची उदाहरणे दिली. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्यापासून मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंतच्या नेतृत्वाचा, तर भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयींपासून नितीन नबीन यांच्यापर्यंतच्या अध्यक्षांचा त्यांनी उल्लेख केला.
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव असले तरी सध्या पक्षाचे नेतृत्व अखिलेश यादव करत आहेत. डीएमकेचे संस्थापक अण्णादुराई यांच्यानंतर करुणानिधी आणि आता एम. के. स्टॅलिन पक्षाचे नेतृत्व करत आहेत. तसेच एआयएडीएमकेचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन आणि तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्यानंतर या पक्षांच्या नेतृत्वातही बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले.
‘संस्थापकत्व हा इतिहास आणि सन्मान आहे; तहहयात मालकीहक्क नाही,’ असा थेट संदेश उमेश पाटील यांनी या पोस्टमधून दिला.
‘शरद पवार संस्थापक आहेत, हे आम्ही नाकारत नाही’
विशेष म्हणजे, उमेश पाटील यांनी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असल्याचे स्पष्टपणे मान्य केले. ‘शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत, हा इतिहास आम्ही नाकारत नाही,’ असे त्यांनी म्हटले.
मात्र, त्याचवेळी राजकीय पक्ष हा कोणत्याही एका व्यक्तीची कायमस्वरूपी खासगी मालमत्ता असू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. पक्षाचे नेतृत्व हे संघटनात्मक प्रक्रियेतून ठरते आणि पक्षाला कायदेशीर मान्यता ही कायद्याच्या चौकटीत मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोस्टच्या शेवटी उमेश पाटील यांनी इंग्रजीतून, ‘Founder is a matter of history. Leadership is a matter of organisation. Legal recognition is a matter of law.’ असा स्पष्ट राजकीय संदेश दिला.
अन् काही वेळातच पोस्ट गायब!
उमेश पाटील यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत येत असतानाच काही वेळातच डिलीट करण्यात आली. पोस्ट नेमकी का हटवण्यात आली, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट अधिकृत कारण समोर आलेले नाही.
मात्र, पोस्ट डिलीट झाल्याने राजकीय चर्चेला आणखी उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना उमेश पाटील यांनी शरद पवारांना अप्रत्यक्षपणे बोचरा टोला लगावल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये सुरू झाली आहे.
एकीकडे शरद पवारांच्या संस्थापकत्वाचा सन्मान करण्याची भूमिका मांडायची आणि दुसरीकडे पक्षावर कोणत्याही एका व्यक्तीचा कायमस्वरूपी मालकीहक्क नसल्याचे सांगायचे, अशी या पोस्टची राजकीय मांडणी होती. त्यामुळे ‘टोला मारला आणि पोस्ट मागे घेतली?’ अशी कुजबुजही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता उमेश पाटील यांची डिलीट केलेली पोस्ट राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाच्या नव्या राजकीय चर्चेचा मुद्दा ठरत आहे.