गर्भलिंग निदानाचा ‘खेळा’त डीवायएसपीचे गुन्हा लपविण्यासाठी मोठे कांड; चार हवालदार लागले कामी; एसीबीने रंगेहाथ पकडले …


पुणे : गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची मागणी, त्यानंतर १५ लाखांच्या लाचेचा व्यवहार आणि अखेर ५ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना एसीबीचा सापळा… अकलूजमधील या प्रकरणाने पोलीस विभागात खळबळ उडवली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलीस हवालदारांसह खासगी व्यक्तींना पकडण्यात आले असून, या संपूर्ण व्यवहारात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांचे नाव समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यासाठी पोलीस हवालदार अनिल शिंदे आणि राहुल वाघ यांची नावे समोर आली आहेत. तक्रारदाराने रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचा दावा आहे. त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळवून देणे तसेच पीसी अँड पीएनडीटी कायद्यातील अतिरिक्त कलमे टाळण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी झाल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले.

या प्रकरणात आबा वळकुंदे या खासगी व्यक्तीच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार केल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी तक्रारीची नोंद झाली. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत आबा वळकुंदे याने तक्रारदाराकडे अनिल शिंदे आणि डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने नमूद केले आहे.

याच तपासात अनिल शिंदेने यापूर्वी १० लाख रुपये स्वीकारल्याचा आणि आणखी १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही समोर आला. त्यामुळे या प्रकरणातील लाचेचा एकूण व्यवहार आणि त्यामागील साखळी एसीबीच्या रडारवर आली.

यानंतर २७ ऑगस्ट रोजी पुन्हा पडताळणी करण्यात आली. यावेळी खासगी व्यक्ती आबा वळकुंदे आणि महादेव माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५ अन्वये नोटीस देण्याच्या बदल्यात पैसे मागितल्याचा आरोप आहे. या व्यवहारात डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी ५ लाख रुपये आणि पोलीस हवालदार राहुल वाघ याच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

ठरल्याप्रमाणे २८ ऑगस्ट रोजी एसीबीने सापळा रचला. माळशिरस-पिलीव रोडवरील पालखी महामार्गाच्या पुलाखाली, जानकर प्लॉटजवळ लाचेची रक्कम स्वीकारताना आबा वळकुंदे आणि महादेव माने यांना पकडण्यात आले. या कारवाईत पोलीस हवालदार राहुल वाघ याचीही भूमिका समोर आली असून, प्रकरणात अनिल शिंदेचे नाव आधीच तपासात आले होते.

ही कारवाई एसीबीच्या उपअधीक्षक नीता मिसाळ, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहाय्यक फौजदार राजेश भाटे, तसेच कॉन्स्टेबल प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, दगडू सोनवणे आणि चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.

आता डीवायएसपी संतोष वाळकेंवर कारवाई होणार का?

या संपूर्ण प्रकरणात लाचेची मागणी डीवायएसपी संतोष वाळके यांच्या नावाने करण्यात आल्याचे एसीबीच्या पडताळणीतील नोंदीत नमूद असल्याचा दावा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सापळ्यात अडकलेल्या व्यक्तींवर कारवाई झाल्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

गर्भलिंग निदानासारख्या गंभीर प्रकरणात कायदेशीर कारवाईच्या नावाखाली एवढ्या मोठ्या रकमेची मागणी कशी झाली, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि संतोष वाळके यांच्यावर पुढे कोणती कारवाई होणार, याकडे अकलूजसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!