सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात IPS ची एन्ट्री, आता गूढ प्रश्नांची उत्तरं मिळणार!

सातारा : काही दिवसांपूर्वी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. आता या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने हा तपास एका तडफदार महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुढ प्रश्नांची आता लवकरच उत्तरे मिळणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या एसआयटीचे नेतृत्त्व महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या करणार आहेत. आता तेजस्वी सातपुते यांना तत्काळ तपास सुरू करावा, असा आदेश देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता लवकर डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या खोलात जाऊन सत्य काय ते बाहेर आणले जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान तेजस्वी सातपुते यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास तत्काळ पूर्ण करावा. तसेच हा तपास करून अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे या एसआयटीला सांगण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे सरकारवर सडकून टीका केली जात आहे. या डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा कळबळजनक दावा मृत डॉक्टर महिलेचे कुटुंबीय तसेच विरोधक करत आहेत. आता या प्रकरणात आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

