लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी दुसऱ्या १० योजना सुरू होतील, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा सरकारला घरचा आहेर…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प काटकसरीचा असल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ न झाल्याने सरकारला घेरले आहे.
त्यातच काही योजनांचा उल्लेख नसल्याने सरकारकडे निधी नसल्याचे सांगत विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने थेट ही योजना बंद केल्यास सरकारला इतर १० योजना सुरू करता येतील असे बेधडक वक्तव्य केले आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले की, बजेट समोर ठेवून योजना चालू कराव्या लागतात, अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात असे त्यांनी म्हटले.
आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिलं, तर ते ३०, ००० कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते आणि एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील असेही त्यांनी थेट म्हटले आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडला आहे. निवडणुकीआधी महायुती सत्तेवर आल्यास २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा झाली नाही. त्याशिवाय, या योजनेसाठी इतर योजनांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.