Independence Day 2024 : मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुढील पाच वर्षात ७५ हजार नवीन जागा वाढवणार, पंतप्रधानांची घोषणा…
Independence Day 2024 : वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावे लागते. यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत आहे. त्यामुळे आता येत्या पाच वर्षात ७५ हजार जागा वाढवण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन भाषण करताना ते बोलत होते.
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकावला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केले. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. Independence Day 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुले देशाबाहेर जात आहेत. यामध्ये जास्त करुन मध्यवर्गीय कुटुंबातील मुले आहेत, यासाठी मुलांचे करोडो रुपये खर्च होतात. सुमारे २५ हजार तरुण दरवर्षी मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशात जातात.
कधी कधी अशा देशात जावे लागते की मी विचार केला तर हैराण व्हायला होते. त्यामुळे गेल्या १० वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या १ लाख केल्या आहे. येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात ७५ हजार नव्या जागा तयार केल्या जातील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.