थेऊर येथे दरोड्याचा प्रयत्न ; ४ जण पकडले, ४ जण पळाले ; लोणी काळभोर पोलिसांच्या कामगिरीने दरोड्याचा मनसुबा फसला…!
उरुळी कांचन : थेऊर (ता. हवेली) येथे घरावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४ चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी (ता. ६) मध्यरात्री एकच्या सुमारास अटक केली आहे. तर त्यांचे तीन ते चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
अक्षय ऊर्फ ओंकार धनाजी सोनवणे (वय २०), प्रसाद धनाजी सोनवणे (वय १९, दोघेही रा. दत्तनगर, थेऊर), आदित्य गणेश सावंत (वय २०, रा. थेऊर) आणि पारस श्रीकांत कांबळे (वय २५, रा. भीमनगर, थेऊर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी विशाल बनकर यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ठाण्याच्या हद्दीत पोलीस सोमवारी (ता.६) गस्त घालत असताना, थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील यशवंत सहकारी साखर कारखान्यासमोरील एका घरावर ७ ते ८ चोरटे घातक हत्यारे घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून ४ चोरट्यांना पकडले. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तर त्यांचे तीन ते चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून पोलीस त्यांच्या मागावर आहे.
दरम्यान, आरोपी अक्षय ऊर्फ ओंकार सोनवणे, प्रसाद सोनवणे, आदित्य सावंत आणि पारस कांबळे यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या चारही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.