हडपसरमध्ये लक्ष्मीपूजन करून कुटुंब गाढ झोपलं; मध्यरात्री देवघराच्या खिडकीतून चोरट्यांचा प्रवेश, ४८ लाखांचा ऐवज लंपास..

पुणे : दिवाळीच्या सणाचा उत्साह सुरू असतानाच पुण्यातील हडपसर परिसरात घरफोडीची मोठी घटना उघडकीस आली आहे. लक्ष्मीपूजन आटोपून घरातील सर्वजण झोपले असताना चोरट्यांनी एका बंगल्याला लक्ष्य केले.

देवघराच्या खिडकीची काच काढून घरात प्रवेश करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि १२ लाख रुपयांची रोकड असा तब्बल ४८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयासमोरील नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीत ही घटना घडली. सोमवारी (९ नोव्हेंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्व सदस्य लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आटोपून झोपले होते.

याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंगल्याच्या देवघराच्या खिडकीची काच काढली आणि आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि १२ लाख रुपयांची रोकड असा एकूण ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
सकाळी प्रकार उघडकीस
दुसऱ्या दिवशी सकाळी घरफोडीचा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. याप्रकरणी अजित रामचंद्र वाडेकर (वय ४९, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दिवाळीच्या सणात घरातील सदस्य उपस्थित असतानाच घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे हडपसर परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
