पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, कोणत्या भागात कधी असणार पाणी जाणून घ्या..

पुणे : महानगरपालिकेने शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पुणेकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. नागरिकांनी वेळेआधी पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा निर्णय ५ मे सोमवारपासून लागू होणार असून विविध भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी पाणीकपात केली जाणार आहे. यामुळे आता कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणी कपात होणार याबाबत माहिती दिली गेली आहे. यामध्ये सोमवारी बालाजीनगर, कात्रज (चौधरी गोठा, गुजर वस्ती), कोंढवा (सावंत कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी) येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मंगळवारी सनसिटी, जुनी धायरी, कात्रज (राजस सोसायटी), कोंढवा (हब टाऊन, कामठे पाटील नगर) या भागात कपात केली जाईल. बुधवारी वडगाव हिंगणे, भांडेआळी, बलकवडे नगर, आणि स्वामी समर्थ नगर (कोंढवा रस्ता) भागात पाणी नसेल. शनिवारी कात्रज गाव, गुजरवाडी, अशरफ नगर, चैत्रबन वसाहत या भागांतील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
गुरुवारी धनकवडी, सहकारनगर भाग 1, कात्रज (मॅजेस्टीक टॉवर, सुखसागरनगर), कोंढवा (गोकुळनगर, शिवशंभो नगर) येथे पाणी बंद राहील. शुक्रवारी आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ मागील परिसर, जांभुळवाडी रस्ता, कोंढवा बु. व कपिलनगर भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जाणवत असून धरणातील पाणी देखील झपाट्याने कणी होऊ लागले आहे. यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. याबाबत पाऊस पडेपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे. येणाऱ्या जूनमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.