हडपसर स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! महत्वाच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द….

हडपसर : हडपसर स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे विभागातील हडपसर स्टेशनवर सुरू असलेल्या सॅटेलाइट टर्मिनल उभारणीच्या कामांमुळे रविवारी, २० जुलै रोजी मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे एकूण १७ महत्त्वाच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना योग्य नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या कामामुळे रविवार,२० जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १७ तासांचा नॉन-इंटरलॉकिंग ट्रॅफिक ब्लॉक राहणार आहे. हे काम हडपसर सॅटेलाइट टर्मिनलच्या मुख्य मार्गाशी जोडणीसाठी आवश्यक असून डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.


रविवारी रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे-दौंड डेमू, दौंड-बेलवंडी लोकल, पुणे-हरंगुळ एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांचे दररोज हजारो प्रवाशांवर अवलंबून असणारे महत्व आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासावे, अन्यथा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे
या कालावधीत प्रवास अत्यावश्यक नसेल तर टाळावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. अनेक प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट आरक्षण केले असल्याने त्यांना आगाऊ सूचना मिळाल्या आहेत, मात्र स्थानिक प्रवासी विशेषतः विनातिकीट प्रवास करणारे नागरिक अधिक प्रभावित होणार आहेत.
मार्गात बदल झालेल्या गाड्या पुढील प्रमाणे..
हडपसर–जोधपूर एक्स्प्रेस आता फक्त पुणे स्थानकावरून सुटेल.
जोधपूर–हडपसर एक्स्प्रेस देखील पुण्यापर्यंतच धावणार.
हडपसर–काझीपेठ एक्स्प्रेस ही गाडी आता दौंड स्थानकावरून सुरू होईल.
हडपसर–सोलापूर एक्स्प्रेस ही गाडी लोणी स्टेशन येथून सुटणार.
सीएसएमटी–बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस साधारणतः चार तास उशिराने धावणार.
सीएसएमटी–चेन्नई एक्स्प्रेस रविवारी एक तास उशिरा पुणे स्थानकावरून सुटेल.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या बदलांची माहिती वेळेत दिली असून, तात्पुरते हे बदल असणार आहेत. संबंधित प्रवाशांनी आपल्या प्रवासाची खातरजमा करूनच पुढील नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.