‘माहेरची प्रॉपर्टी दे, २ कोटी आण’; वाकडमध्ये विवाहितेचा संशयास्पद अंत, भावाच्या आक्रोशाने हादरलं पुणं


पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून विवाहित महिलेच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड परिसरातील शिल्पा सचिन गवारे या विवाहितेने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची माहिती आहे. जमीन खरेदीसाठी माहेरून तब्बल दोन कोटी रुपये आणावेत आणि माहेरच्या संपत्तीत हिस्सा घ्यावा, यासाठी तिच्यावर सासरच्या मंडळींकडून दबाव आणि छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

शिल्पाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर तिचा पती सचिन गवारे, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पाला शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप तिच्या भावाने केला आहे. पती दारू पिऊन घरी आल्यानंतरही तिच्याशी गैरवर्तन आणि त्रास केला जात असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

बहिणीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचा भाऊ रुग्णालयात पोहोचला. तिथे शिल्पाला स्ट्रेचरवर पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचं त्याने सांगितलं. या घटनेनंतर कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भावाने व्यक्त केलेली व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे. “उद्या माझी बहीण मला राखी बांधायला नाही,” अशी भावना व्यक्त करत त्याने बहिणीच्या छळाबाबत आरोप केले. सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचंही त्याने सांगितलं.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडा, आर्थिक मागण्या आणि विवाहित महिलांच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली होती. त्यानंतर आता वाकडमधील शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने पुणे हादरलं आहे.

दरम्यान, वाकड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांनी केलेल्या आर्थिक मागणी, शारीरिक आणि मानसिक छळाच्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या तपासातून शिल्पाच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि आरोपांमागील सत्य समोर येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!