‘कृष्णा आंधळेचं सिक्रेट मला माहितीय’, महिलेच्या दाव्याबाबत नवा ट्विस्ट, खळबळजनक माहिती आली समोर..

बीड : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक खळबळजनक ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
कृष्णा आंधळेचा शोध सुरू असतानाच मस्साजोग येथे देशमुख यांच्या घराच्या परिसरात एका अज्ञात महिलेने काही दिवसांपूर्वी धाव घेतली होती. कृष्णा आंधळेचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा या महिलेने केला होता.
महिलेच्या या दाव्यानतर एकच खळबळ उडाली होती. याच महिलेसोबत कृष्णा आंधळे राहत असावा, असा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट उघड झाला आहे. संबंधित महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली असून, रत्नागिरी पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे.
मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सदर महिला बीडहून रत्नागिरीकडे रवाना झाली होती. पण अद्याप ती रत्नागिरीला पोहोचलेली नाही. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत निष्कर्ष काढला आहे की ही महिला रत्नागिरीजवळील खेडशी गावातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती आणि तिचे कुटुंबीय देखील तिला मानसिक रुग्ण असल्याचे सांगतात.
दरम्यान, पोलिसांनी या महिलेच्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे. तिच्याकडून मिळणारी माहिती सत्य आहे की नाही, याचा तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासात हा नवा धक्का मानला जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार कृष्णा आंधळे (Krishna Aandhale) याच्या शोधासाठी पोलीस जोरदार प्रयत्न करत आहेत. या महिलेच्या दाव्यामुळे तपासाला वेगळे वळण मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.