मी गुढी-बिढी उभारत नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला अन्…! विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य

नागपूर : माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुढीपाडव्याबाबत एक विधान करत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. ‘मी गुढी-बिढी काही उभारत नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, आम्ही या भानगडीत पडत नाही, ज्याला पडायचं त्याला पडू दे, मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही,’ असं म्हणत मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मात्र याच वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या आणि दुसरीकडे ते याच सणावर प्रश्न उपस्थित करत असल्याने संभ्रमाची स्थिती आहे.
वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून याच सणासाठी शुभेच्छाही दिल्या. सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवर वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलं. ‘गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.’ अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
नंतर मात्र त्यांनीच कार्यक्रमात गुढी पाडव्यावर प्रश्न उपस्थित केल्याने अनेकांनी त्यांच्या या दुहेरी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान, राज्यात सध्या विविध वादांची मालिका सुरू आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेला वाद ताजा असतानाच, गेल्या आठवड्यात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने याने एकनाथ शिंदे यांना उद्देशून गायलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे नवा वाद पेटला.
कुणाल कामराने माफी न मागण्याचा निर्णय जाहीर करत आणखी काही व्हिडीओज पोस्ट केल्याने हे प्रकरण आणखीनच चिघळलं. हे सर्व वाद अजूनही शमलेले नसतानाच आता काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे वातावरण तापले आहे.