गरोदर पत्नीवर संशय; पती डेटॉलची बाटली घेऊन खोलीत आला अन्…पुण्यातील घटनेने उडाली खळबळ

पुणे : पुण्यातून सासरच्या छळाच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या आहेत. लग्नात योग्य पाहुणचार केला नाही, तसेच हुंड्यात महागड्या वस्तू दिल्या नाहीत, अशा कारणांवरून विवाहितांचा छळ केल्याचा आरोप आहे.
एका प्रकरणात संशयी पती आणि सासरच्यांनी गरोदर विवाहितेला बळजबरीने ‘डेटॉल’ पाजल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांत पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

गरोदर असतानाही छळ; ‘डेटॉल’ पाजल्याचा आरोप
पहिल्या प्रकरणात २२ वर्षीय विवाहितेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने मारहाण करत होता. गरोदर असतानाही सासरच्या मंडळींनी तिला त्रास देत बळजबरीने ‘डेटॉल’ पाजल्याचा आरोप तिने केला आहे.


या प्रकरणी पोलिसांनी पती प्रतीक पिंगळे (वय २७) आणि सासू वंदना सुनील पिंगळे (वय ४५, दोघे रा. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गरोदर पत्नीला घरखर्चासाठी दबाव
दुसऱ्या प्रकरणात गरोदर विवाहितेवर घरखर्चाचा भार उचलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. पतीकडून सातत्याने शिवीगाळ आणि मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अखेर गरोदर महिलेला नांदवून घेण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सात्त्विक प्रधान (वय ३०, रा. भुवनेश्वर, ओडिशा) याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.