पुणेकरांचा वीकेंड कसा जाणार? ‘तो’ पुन्हा सक्रिय होतोय! पुढील 3 दिवसांचा हवामान अंदाज


पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे विकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर हवामान विभागाचा ताजा अंदाज पाहूनच नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुण्यात पुढील तीन दिवस रिमझिम सरी पडण्याची शक्यता आहे. तर पुण्यातील घाटमाथा परिसर आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र

बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

ऑगस्टमध्ये पुण्यात पावसाचा जोर कमी

जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. यंदाच्या हंगामात पुण्यात झालेल्या पावसाची आकडेवारी अशी आहे:

१ ते ३० जून: ६४ मिमी
१ ते ३१ जुलै: ५२५ मिमी
१ ते १३ ऑगस्ट: ५७ मिमी

पुण्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूच

गुरुवारी सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र, अवघ्या तासाभरात पुन्हा ऊन पडले. दिवसभरात १.३ मिमी पावसाची नोंद झाली.

पुण्यात गुरुवारी कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुढील तीन दिवसही पुण्यात ऊन-पावसाचा खेळ आणि रिमझिम सरी सुरू राहण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!