ड्रायव्हर बनून मालकाचा विश्वास जिंकला, 12 लाखांची कार लंपास केली; B.Tech इंजिनिअरचा ‘हायटेक’ प्लॅन पोलिसांनी असा उधळला!

पुणे : उच्चशिक्षित असूनही तंत्रज्ञानाचा वापर गुन्ह्यासाठी करणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निझामी शमसुद्दीन या B.Tech शिक्षित तरुणाने आधी कार मालकाचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर ड्रायव्हरची नोकरी मिळवून तब्बल 12 लाख 45 हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी XL6 स्मार्ट हायब्रिड कार चोरी केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल नंबर वापरणेही टाळले.
आरोपीने इंटरनेटच्या माध्यमातून व्हर्च्युअल मोबाईल नंबर तयार केला आणि त्याच नंबरवरून कार मालक जिगर घनश्याम पटेल यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. विश्वास निर्माण झाल्यानंतर त्याने ड्रायव्हरची नोकरी मिळवली. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर त्याने संधी साधत अवघ्या 17 मिनिटांत अंधेरी पूर्व येथील रामगुरूदेव सोसायटीतून कार मालकाच्या परवानगीशिवाय कार घेऊन पळ काढला.

कार चोरी झाल्यानंतर मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने बनावट नंबरचा वापर केल्यामुळे त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. मात्र, मेघवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. तपासाची दिशा पुण्याकडे गेल्यानंतर पोलिसांनी कोंढवा परिसरातून निझामीला ताब्यात घेतले.


चौकशीत चोरीची कार हैदराबादमध्ये लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हैदराबाद गाठून कार जप्त केली. अशाप्रकारे बनावट ओळख आणि आभासी नंबरच्या मदतीने पोलिसांना चकवा देण्याचा आरोपीचा प्रयत्न फसला.
या कारवाईत पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम आणि पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काम केले. तपासात सहायक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, सहाय्यक फौजदार पवार, पोलीस हवालदार राठोड तसेच पोलीस शिपाई कापसे, खरात आणि कांजर सहभागी होते.
दरम्यान, आरोपीने यापूर्वीही अशाच पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का? तसेच या कार चोरीमागे त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.