बारामतीत हनीट्रॅप प्रकरण! डॉक्टराप्रमाणे अनेकांची फसवणूक? तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन, नेमकं काय घडलं?

बारामती : बारामतीतील डॉक्टरांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जबरदस्तीने लग्न करण्याची धमकी देत गुन्हेगारांच्या मदतीने दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी व त्यापैकी सहा लाखांची खंडणी स्वीकारतेवेळी पोलिसांनी अटक केलेल्या टोळीचे आणखीही उपद्व्याप असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

तसेच या संबंधित प्रकरणासारखेच इतरही लोकांना या टोळीने खंडणी मागितली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, अशा प्रकारचे खंडणीचे प्रकार झाले असल्यास संबंधितांनी बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधावा.
तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन बारामती पोलिसांनी केले आहे. या संदर्भातील काही तक्रार असल्यास बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकरण काय?
१२ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेत बारामतीतील एका डॉक्टरांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा बहाणा करत लॉजमध्ये नेऊन शरीरसंबंध ठेवून बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा, अथवा हनीट्रॅप करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा टोळीचा इरादा होता.
मात्र संबंधित डॉक्टरने लॉजवर येण्यास नकार दिल्याने, जबरदस्तीने लग्न लावण्याच्या इराद्याने बारामतीतील काही गुन्हेगारांना बोलवून डॉक्टरचे अपहरण करण्यात आले व त्यास आळंदीला लग्नाला नेण्याच्या निमित्ताने लोणी देवकर येथील एमआयडीसीत नेऊन दहा लाखांची खंडणी मागितली.
यातील सहा लाखांची खंडणी देण्यास डॉक्टर तयार झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सहा लाखांचा खंडणीचा चेक स्वीकारताना बारामती तालुका पोलिसांनी एका गुन्हेगारास पकडले आणि त्यानंतर संपूर्ण टोळी जेरबंद केली.
या प्रकरणात पोलिसांनी झुंजार माघाडे, ज्योती कदम, अंकिता भोसले, निलेश बनसोडे, चेतन गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात आता पोलीस पुढील तपास करत असून या टोळीने आणखीही काही जणांना खंडणी मागून हनीट्रॅप केल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, असा प्रकार कोणाच्याही बाबतीत झाला असल्यास त्यांनी निःसंशयपणे बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामुळे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
