अशोक खरात प्रकरण उघड करणारा पत्रकारच अडचणीत; 1 लाखांच्या खंडणीचा गुन्हा, रुपाली चाकणकरांच्या ‘हस्तकां’चा केला गंभीर उल्लेख

श्रीरामपूर : नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या प्रकरणाला आता आणखी एक वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणाला वाचा फोडणारे पत्रकार दत्तात्रय खेमनार यांच्याविरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून एक लाख रुपये मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासोबतच जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूरजवळील लोणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच पत्रकार खेमनार यांच्यावर झालेल्या कारवाईने या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांना नवं वळण मिळालं आहे.

दरम्यान, खेमनार यांनी या आरोपांनंतर पोलिसांकडे निवेदन देत आपली बाजू मांडली आहे. आपल्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न होत असून, काही राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे हस्तक आपल्याला या प्रकरणात अडकवत असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे. हे आरोप खेमनार यांनी केले असून, त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.


‘आधीही जीवघेणे हल्ले झाले’
दत्तात्रय खेमनार यांनी आपल्या निवेदनात आपल्यावर यापूर्वी दोन ते तीन वेळा जीवघेणे हल्ले झाल्याचा दावा केला आहे. या घटनांबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. वाळू तस्करी, खासगी सावकारी आणि भोंदूगिरीविरोधात आवाज उठवल्यामुळे तसेच संबंधित बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे आपल्यावर हल्ले झाल्याचा दावा त्यांनी केला.
पोलीस संरक्षण अचानक काढल्याचा दावा
खेमनार यांच्या म्हणण्यानुसार, 23 मार्चपासून 20 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, 20 सप्टेंबरनंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता हे संरक्षण काढून घेण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित व्यक्तींकडून आपल्यावर कोणत्याही क्षणी जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या पार्श्वभूमीवर खेमनार यांनी पोलीस अधीक्षकांकडे पुन्हा पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच आपल्याविरोधात आलेल्या तक्रारीची संपूर्ण चौकशी करून त्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, अशोक खरात न्यायालयीन कोठडीत असून त्याची पत्नी कल्पना खरात हिला सशर्त जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता पत्रकारावरील खंडणीचा गुन्हा, पोलीस संरक्षणाचा मुद्दा आणि खेमनार यांनी केलेले गंभीर आरोप यामुळे पुढील तपासाकडे लक्ष लागलं आहे.