गृहकर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांना मिळणार दिलासा? निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात घेणार तुमच्या आमच्या मनातला निर्णय..

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निर्मला सीतारामन या आठव्यांदा संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.
या अर्थसंकल्पात गृह कर्जधारकांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात, असा अंदाज आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार, केंद्र सरकारकडून गृह कर्जावरील व्याजाच्या आधारे प्राप्तीकरात देण्यात येणारी सूट आणखी वाढवली जाऊ शकते.
सध्या होम लोनच्या व्याजावर आयकरात २ लाखांपर्यंतची सूट मिळते. मात्र, मध्यमवर्गीयांना घर घेणे सोपे व्हावे, यासाठी केंद्र सरकार होम लोनवरील च्या मर्यादेत वाढ केली जाऊ शकते.याशिवाय, केंद्र सरकारकडून परवडणाऱ्या घरांसाठीची किंमतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते. सध्या परवडणाऱ्या घरांसाठी ४५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मेट्रो शहरांमध्ये बांधकामाचा वाढलेला खर्च आणि इतर घटक लक्षात घेता केंद्र सरकारने ही मर्यादा ७५ ते ८० लाखांपर्यंत वाढवावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यादृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा होऊ शकते. केंद्र सरकारकडून बांधकाम व्यावसायिकांसाठी त्यादृष्टीने कर सवलती जाहीर केल्या जाऊ शकतात, असा अंदाज आहे.