अधिवेशनाच्या तोंडावर राजकीय ‘हायव्होल्टेज ड्रामा’! विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, सरकार अडचणीत येण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उद्यापासून (२२ जून) पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून त्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली असून यात सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विरोधकांनी अधिवेशनाच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर अधिकृत बहिष्कार जाहीर करत सरकारला थेट आव्हान दिले आहे.

या पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरे गट) चे नेते अंबादास दानवे, भास्कर जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर आणि राज्यातील विविध प्रश्नांवर जोरदार टीका करत अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले.
भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका करताना राज्यातील अल निनो परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विचारले की, “अल निनोचा धोका सरकारने मान्य केला आहे, मग शेतकऱ्यांसाठी नेमकी तयारी काय केली?” तसेच सरकार फक्त घोषणा करते, पण अंमलबजावणीमध्ये कमी पडते, असा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी हमीभाव आणि कर्जमाफीचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना अद्याप योग्य हमीभाव मिळत नसल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिलेल्या कर्जमाफीबाबत त्यांनी दावा केला की त्या काळात शेतकऱ्यांकडून फारशा तक्रारी आल्या नव्हत्या.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. केवायसी सक्तीमुळे तब्बल ८१ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप करत, ही योजना निवडणुकीपुरतीच होती का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
अलीकडील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे.
या सर्व घडामोडींमुळे पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची शक्यता असून पहिल्याच दिवशी चहापानावर बहिष्कारामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.