आता समुद्राखालुन हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार ! मुंबईत होणार पहिला बोगदा…!


मुंबई : मुंबई-अहमदाबादसाठी बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून, किमान सात भारतीय कंपन्यांनी पाण्याखालील बोगदा बांधण्यात स्वारस्य दाखवले आहे. आता भारतातील पहिला  समुद्राखालील बोगदा मुंबईत तयार होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या बोगद्यातून प्रवास करेल. समुद्राखालून ७ किमी भागासह तब्बल २१ किमी लांबीच्या एकूण बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून अधिका-यांना त्या ९ फेब्रुवारीपासून प्राप्त होतील. या प्रकल्पाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास आणखी किमान तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा स्थानकांदरम्यान ठाणे खाडीवर हा बोगदा असेल. बीकेसी ते शिळफाटा हे अंतर जवळपास ३५ किलोमीटर इतके आहे. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर बोगदा पूर्ण होण्यासाठी सुमारे ५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. परंतु भारतात हे प्रथमच काम करण्यात येत असून, समुद्राखालील हा बोगदा भारतातील पहिला बोगदा असेल.

प्रस्तावित हाय-स्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर मुंबईतील ठाणे खाडीतून जाणार आहे. हा भाग फ्लेमिंगो आणि जवळच्या खारफुटीसाठी संरक्षित अभयारण्य आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक एका बोगद्याद्वारे समुद्राखालून तयार केले जातील. जेणेकरून परिसंस्थेला कुठलाही त्रास होणार नाही, असे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सांभाळणा-या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे.

महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प हा ५०८.१७ किमी लांबीचा कॉरिडॉर आहे. मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना १२ स्थानकांद्वारे जोडले जाईल. मुंबई बीकेसी, ठाणे शिळफाटा, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती ही ती बारा स्थानके. या प्रकल्पाची अंदाजे किंमत १.१ लाख कोटी रुपये इतकी आहे. प्रकल्पाच्या बांधकामाचा पहिला टप्पा २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

बोगद्याची रुंदी १३.२ मीटर
हा बोगदा सर्वात लांब रेल्वे वाहतूक करणारा, तसेच भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा असेल. हा बोगदा १३.२ मीटर रुंदीची सिंगल ट्यूब असेल. हे बांधकाम आवश्यकतेनुसार न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड आणि टनेल बोरिंग मशीन या दोन्ही पद्धतींनी केले जाईल. प्राधिकरणाने प्रकल्पासाठी पाण्याखालील सर्वेक्षण आधीच केले आहे.

ताशी ३२० कि.मी. वेगाने धावणार रेल्वे
सध्याच्या योजनेनुसार या मार्गावरील ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावतील. पीक अवर्समध्ये दर २० मिनिटांनी, तर नॉन-पिक अवर्समध्ये दर ३० मिनिटांनी ट्रेन निघेल. प्रत्येक दिशेने दररोज ३५ ट्रेन प्रवास करतील. संपूर्ण अंतर पार करण्यासाठी जवळपास १ तास ५८ मिनिटांचा वेळ लागेल. सध्या हे अंतर पार करण्यासाठी किमान ८ तासांचा वेळ लागतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group