‘पती मरणार आधीच समजलं, पत्नीनेही थेट जीवन संपवलं’, दोघांची एकत्र निघाली अंत्ययात्रा, घटनेने सगळेच हळहळले..

पुणे : एका महिलेनं आपल्या पतीच्या विरहात आयुष्याचा शेवट केला आहे. गंभीर आजारामुळे आपला पत्नी आयुष्याच्या अंतिम घटका मोजत आहे, याची कल्पना येताच महिलेनं इंद्रायणी नदीच्या पात्रात उडी घेऊन जीवन संपवलं आहे. या घटनेने सगळेच हळहळले आहेत. ही घटना पुण्यातील देवाची आळंदी परिसरात घडली आहे.
नंतर काही तासांमध्ये पतीचा देखील मृत्यू झाला. दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करावे लागले. दोघंही नांदेड येथील होळी भागातील रहिवासी आहेत. दोघंही आळंदी येथील गुरु किशन महाराज साखरे यांच्या सानिध्यात आले. भक्तीमार्गाला लागल्यानंतर चक्रवार दाम्पत्य आळंदीत वास्तव्याला आलं. इथं घर घेऊन दोघंही राहत होते. असे असताना मागील काही दिवसांपासून पंढरीनाथ चक्रवार यांना गंभीर आजाराने ग्रासलं होतं.
त्यांच्यावर उपचार सुरु होते. पंढरीनाथ यांना घरी घेऊन जा, असं डॉक्टरांनी सांगितलं. गंगामणी पतीला घेऊन घरी आल्या. पती आयुष्याचा शेवटचे श्वास मोजत होते. पतीचा मृत्यू होणार याची कल्पना आल्यानंतर गंगामणी यांनाही विरह सहन नाही झाला. त्यांनी आपल्या मुलांना फोन करून ‘वडील फार काळ जगणार नाहीत’ असं सांगितले.
यानंतर गंगामणी यांनी साखरे महाराजांच्या मठातील पांडुरंगाचं आणि ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेऊन गंगामणी चक्रवार थेट इंद्रायणी नदीच्या दिशेनं गेल्या. येथील एका डोहात उडी मारून त्यांनी आयुष्याचा शेवट केला. यानंतर पुढच्या काही तासांत पंढरीनाथ चक्रवार यांनीही शेवटचा श्वास घेतला. यामुळे सगळ्यांचे डोळे पाणावले.
पंढरीनाथ चक्रवार (वय-६५) आणि गंगामणी चक्रवार (वय -५५) असं मयत दाम्पत्याचं नाव आहे. यावेळी दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वांचे डोळे पाणावले होते. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.