लोणी काळभोरमध्ये ‘नर्सरी’च्या नावाखाली मोठा घोटाळा; बंटी-बबलीचा डाव, लाखोंची फसवणूक..

लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात “नर्सरी व्यवसायात मोठा नफा मिळेल” असे आमिष दाखवत दाम्पत्याने एका व्यावसायिकाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी दाम्पत्य फरार आहे.

फिर्यादी महेंद्र बाबू जैनजांगडे (वय ३९, रा. सिद्राममळा, रामदरा रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किशोर लक्ष्मण साठे (वय ३५) आणि अर्चना किशोर साठे (वय २६) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये साठे याने जैनजांगडे यांना नर्सरी व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. “तुमच्या पत्नीला अनुभव असल्याने व्यवसाय फायदेशीर ठरेल,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.

यानंतर १ नोव्हेंबर २०२५ रोजी जैनजांगडे यांनी दोन लाख रुपये धनादेशाद्वारे आणि दोन लाख रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र, व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देऊनही आरोपी टाळाटाळ करत राहिले. पैसे परत मागितल्यावर डिसेंबर २०२५ मध्ये दिलेला २ लाख २० हजार रुपयांचा धनादेश बाऊन्स झाला.

दरम्यान, चौकशीत साठे दाम्पत्याने परिसरातील इतर नागरिकांनाही विविध व्यवसायांचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. काही अन्य नागरिकही या घोटाळ्याचे बळी ठरल्याची माहिती आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आरोपींचे मोबाईल बंद असून ते पुणे शहर सोडून फरार झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.