उरुळीकांचन येथील प्रसिद्ध हॉटेल सावतामाळीचे मालक अर्जून बोराटे यांचा अपघाती मृत्यू; विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने पाठिमागून दिली धडक…

उरुळी कांचन : विरुद्ध दिशेने भरधाव ट्रक चालवून मुख्य रस्त्यावर चहा विक्री करुन येणाऱ्या ज्येष्ठ नागरीकाला पाठिमागून ट्रकने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उरुळीकांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौकात घडली आहे. या घटनेत उरुळीकांचन येथील प्रसिद्ध चहा नाष्ट्याचे हॉटेल असलेल्या सावतामाळी हॉटेल मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अर्जुन गंगाराम बोराटे असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरीकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे नातू तुषार सुनील बोराटे (वय – ३१ वर्ष, रा. तळवाडी चौक हरजीवन हॉस्पिटल समोर, ता.हवेली, जि.पुणे) यांनी याप्रकणी तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक अमोल सोमेश्वर गवई (वय – ३० वर्ष, रा. डेरंगे वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सोलापूर–पुणे महामार्गावर तळवाडी चौकात अर्जुन गंगाराम बोराटे हे रस्ता ओलांडत असताना, पुण्याकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या अशोक लेलँड ट्रक नंबर (MH -१२ -VT- ३४०७) या वाहनाने अर्जुन बोराटे यांना पाठिमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत बोराटे हे रस्त्यावर आपटून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कान व नाकातून रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने जखमी अवस्थेत सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये दाखल केले असताना उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अर्जुन बोराटे यांचा

उरुळीकांचन शहरात मुख्य चौकात चहा नाष्ट्याचा सावतामाळी हॉटेल हा ३० वर्षापासूनचा व्यवसाय आहे. वयाच्या सत्तरीत ओलांडूनही ते या हॉटेलमध्ये सक्रिय व्यवसाय करीत असल्याने फार कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांची तिसरी पिढी या ठिकाणी व्यवसाय करीत असल्याने त्यांच्या व्यवसायाची ख्याती सर्वत्र आहे. मात्र दुर्देवी घटनेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.