बाप्पाच्या आगमनासोबत पावसाची जोरदार एन्ट्री! मुंबईसह राज्यात पावसाचा धुमाकूळ; २० जिल्ह्यांना अलर्ट

पुणे : गणेशोत्सवाचा उत्साह असतानाच बाप्पाच्या स्वागतासाठी पावसानेही ताल धरला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, दक्षिण छत्तीसगडमार्गे हा कमी दाबाचा पट्टा विदर्भासह मराठवाड्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत. तसेच जलसाठ्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत पावसाचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे विदर्भासह राज्यातील विविध भागांत दमदार पाऊस होऊ शकतो. नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईसह इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील अन्य भागांतही मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप
मुंबईसह उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरात रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मान्सूनने पुन्हा हजेरी लावली आहे.
गणरायाच्या आगमनापूर्वी वसई-विरार परिसरातही रात्रभर पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार सरी सुरू आहेत. सलग पडणाऱ्या पावसामुळे काही सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. आभाळ पूर्णपणे भरून आले असून, दिवसभर पाऊस सुरू राहिल्यास गणरायाच्या आगमनाच्या तयारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सकाळच्या सुमारास शहरातील वाहतूक सुरळीत सुरू होती. तसेच विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवाही सुरळीत सुरू आहेत.
धुळ्यात ४३ दिवसांनंतर पाऊस
धुळे शहरासह जिल्ह्यात तब्बल ४३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे गणेशमूर्ती विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतीच्या दृष्टीने या पावसामुळे काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कपाशीच्या बोंडांवर रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
नागपूर परिसरात पावसाची हजेरी
२० ते २२ दिवसांच्या खंडानंतर राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही पावसाचे आगमन झाले आहे. पावसामुळे खरीपातील काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. काल दुपारीही नागपुरात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या.
प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शहरात पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास पिकांना काहीसा दिलासा मिळण्यासोबतच शेतकऱ्यांचीही चिंता कमी होण्याची शक्यता आहे.
गोंदियात पावसामुळे धान पिकाला संजीवनी
गोंदिया जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे धान पिकाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी धान पिकासाठी सध्या आणखी जोरदार पावसाची गरज आहे.
सप्टेंबर महिना सुरू होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे धान पीक संकटात सापडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत तब्बल ९३ टक्के पाऊस झाला होता.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. सध्या धान पीक भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
काल रात्री झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी धान पिकासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा कायम आहे.