लालबागच्या राजाच्या दर्शनाबाबत महत्त्वाची अपडेट; गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची रांग पोहोचली थेट…

पुणे : लालबागचा राजा हा जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासूनच भाविकांची लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. यंदाही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस असून, सकाळपासूनच लालबाग परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे.
करी रोड, चिंचपोकळी आणि परळ या रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची पावले लालबागच्या दिशेने वळत आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या तीन मानाच्या गणपती मंडळांचे गणपती याच परिसरात आहेत. त्यापैकी नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी होत आहे.

कालपासूनच अनेक भाविक नवसाच्या रांगेत थांबले होते. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीही भाविकांची मोठी रांग लागली आहे. मुंबईसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.


लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठीही गणेशभक्तांची मोठी रांग लागली आहे. दर्शनासाठी भाविकांची तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे.
लालबागच्या राजाच्या दरबारात तोच उत्साह
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, कोलकाता यांसह विविध राज्यांतून भक्तगण मुंबईत दाखल झाले आहेत. काही भाविक नवस करण्यासाठी, तर काही नवस फेडण्यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी येतात.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केले जातात. यंदाही लालबागच्या राजाच्या दरबारात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
GSB गणपतीचेही विशेष स्थान
वडाळ्यातील GSB गणपतीचेही मुंबईच्या गणेशोत्सवात विशेष स्थान आहे. मुंबईतील प्रसिद्ध आणि श्रीमंत गणपती मंडळांपैकी एक म्हणून GSB गणपतीची ओळख आहे. यंदा या गणेशोत्सवाची 72 वर्षांची परंपरा पूर्ण होत आहे.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली बाप्पांची मूर्ती हे या गणपतीचे प्रमुख आकर्षण असते. धार्मिक श्रद्धा, पारंपरिक पद्धती आणि सामाजिक सेवेचा अनोखा संगम या गणेशोत्सवात पाहायला मिळतो.
धार्मिक आणि वैदिक पद्धतीने विधी पार पाडत आज गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. GSB परंपरेतील गणपतीची सजावट आणि अलंकार भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.