धार्मिक विधीसाठी आश्रमात गेली, तिथेच महिलेवर अत्याचाराचा आरोप! येवल्यातील उमाकांत खंडेश्वर महाराजाला अटक; पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती


नाशिक : धार्मिक विधीसाठी आश्रमात गेलेल्या महिलेवर अत्याचार झाल्याच्या आरोपामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. येवला येथील दत्तवाडी आश्रमातील उमाकांत खंडेश्वर महाराज याच्याविरोधात महिलेने तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पोलिसांना चकवा देत फरार झाला होता. अखेर तीन दिवसांपूर्वी दिंडोरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धार्मिक विधीसाठी आश्रमात गेली अन् घडला धक्कादायक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला धार्मिक विधी करण्यासाठी येवला येथील दत्तवाडी आश्रमात गेली होती. याच ठिकाणी उमाकांत खंडेश्वर महाराज याने तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. सुरुवातीला तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

महिलेची तक्रार दाखल झाल्यानंतर उमाकांत खंडेश्वर महाराज पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तो फरार झाल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याचा माग काढला आणि तीन दिवसांपूर्वी दिंडोरी परिसरातून त्याला अटक केली. या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुरुवातीला त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या काळात पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित तपास केला. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आता आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, तक्रारीतील आरोप आणि घटनाक्रमाच्या अनुषंगाने पोलीस माहिती गोळा करत आहेत.

अशोक खरात प्रकरणानंतर पुन्हा चर्चा

राज्यात यापूर्वी अशोक खरात प्रकरणामुळे धार्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींवरील आरोप आणि त्यांच्या कथित गैरवर्तनाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर येवल्यातील या प्रकरणामुळेही परिसरात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, उमाकांत खंडेश्वर महाराज याच्यावरील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांकडून तक्रारीच्या आधारे तपास सुरू असून, या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!