उन्हाळी ट्रेक आला तरुणांच्या अंगलट! पेब किल्ल्यावर रस्ता भरकटला, उष्माघाताने तरूणी बेशुद्ध अन्न …

माथेरान : कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरूण-तरूणी ग्रुपने पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते. त्यांचा ट्रेकिंगचा हाच प्लान त्यांच्या अंगलट आला आहे. किल्ल्यावर जाताना ते रास्ता भरकटले, त्यातच अन्न-पाणी संपल्याने आणि उष्मघातासारखी परिस्थिती उद्भवल्याने त्या ग्रुपमधील एक तरूणी बेशुद्ध पडल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली.
नंतर या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच, त्यांनी सदर तरुणांना रेस्क्यू करण्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेला पाचारण करण्यात केले आणि अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर त्या ग्रुपची सुखरूप सुटका झाली.मुंबईतील एका ग्रुप सोबत ही धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणांचा हा ग्रुप माथेरानच्या शेजारील पेब किल्ला अर्थात विकट गड या ठिकाणी ट्रेकला गेले होते. नेरळ स्थानकापासून रिक्षाद्वारे आनंदवाडी येथे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर पेब किल्ल्याच्या दिशेने भर उन्हात चढाई करत होते. नंतर जंगलातील मार्ग चुकल्यामुळे आपल्या कडून किल्ल्याकडे जाणारा रस्ता भरकटला आहे असे त्यांच्या लक्षात आले.
असे असताना त्यांनी सोबत आणलेलं खाण्या-पिण्याचं साहित्य संपले. त्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने व त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नव्हते. यामुळे हिबा ही तरुणी बेशुद्ध पडली. इतरांना देखील त्रास होऊ लागला. तरुणांनी झालेल्या प्रकाराबाबत आपल्या नातेवाईक तसेच मित्रमंडळींना दूरध्वनी वरून माहिती दिली.
नातेवाईकांनी या किल्ल्यापासून जवळच असलेल्या माथेरान वनविभाग, पोलिसांसह नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याशी संपर्क साधला. बचाव कार्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेचे वैभव नाईक,चेतन कळंबे, संदीप कोळी, महेश काळे, सुनील कोळी, विकी फाळे, राहुल चव्हाण, सुनील ढोले दिनेश सुतार तसेच स्थानिक आदिवासी तरुण राम निरगुडा, काळूराम दरोडा यांना देखील पाचारण करण्यात आले होते.
यावेळी सह्याद्री रेस्क्यू टीमचे टीम लीडर चेतन कळंबे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी या सात ही तरुणांना अत्यावश्यक असलेले वैद्यकीय व खाण्याचे साहित्य, पाणी, तसेच मानसिक आधार देत गडावरून सुखरूप खाली आणले. यामुळे मोठी घटना टळली आहे.