गोड आंब्याच्या आड लपलेलं विष? ‘ऑपरेशन मँगो’ने उघड केली धक्कादायक फसवणूक


मुंबई : आंबा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असून उन्हाळा सुरू झाला की रसाळ आंब्याची चव चाखण्यासाठी सर्वजण आतुर असतात. पण याच आंब्याच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काही व्यापारी आता आरोग्यासाठी घातक पद्धतीने कृत्रिमरीत्या आंबे पिकवत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) “ऑपरेशन मँगो” अंतर्गत राज्यभरात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि भिवंडीतील बाजारपेठांमध्ये 150 पथके तैनात करून गोदामे आणि फळबाजारांवर छापेमारी केली जात आहे.

वाशीतील APMC मार्केटमध्ये झालेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयास्पद आंबे आणि घातक रसायने जप्त करण्यात आली आहेत. काही व्यापारी कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीन स्प्रेचा वापर करून आंबे काही तासांत पिकवत असल्याचे उघड झाले आहे. हे रसायन अन्नासाठी प्रतिबंधित असून त्यातून निघणारा वायू आंब्याचा रंग बदलून तो आकर्षक दिसतो, मात्र तो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतो.

अशा आंब्यांच्या सेवनामुळे घशात जळजळ, उलट्या, पोटदुखी, अतिसार यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ सेवन केल्यास मज्जासंस्थेवर परिणाम आणि गंभीर आजारांचा धोका वाढतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

एफडीएने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारे आंबे पिकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून परवाना रद्द करणे, दंड आणि फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. सध्या जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

नागरिकांनीही सतर्क राहून विश्वासार्ह ठिकाणांवरूनच फळे खरेदी करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. “ऑपरेशन मँगो”मुळे बाजारातील या धोकादायक फसवणुकीचे वास्तव समोर येत असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!