राज्यात धो-धो पाऊस बरसणार! हवामान विभागाचा मोठा इशारा; तब्बल ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, अनेक भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतापासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्याने वाहतूक संथ झाली. कल्याण-डोंबिवलीतही पावसाची संततधार सुरू असून, सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. शाळकरी विद्यार्थ्यांना आणि पालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला.

गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणीनंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र, आता पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने खरीप पिकांना याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.