पुढील २ दिवस मुसळधार राज्यात पावसाचा इशारा; पुण्याला रेड अलर्ट जारी, वाचा हवामानाचा अंदाज…

पुणे : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली आहे. दक्षिण कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतीवृष्टी होण्याची शक्यता आहे. आषाढी एकादशीला देखील राज्यभरात आषाढधारा कोसळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील शनिवारी रात्रीपासून चंद्रपूरसारख्या शहरात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये कमी पाऊस झाल्याने चिंता वाढली होती, मात्र आता जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे वेधशाळेने घाटमाथ्यांसाठी ६ आणि ७ जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केला आहे. या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दरड कोसळण्याचा आणि वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत देखील पावसाचा जोर कायम असून नालासोपारा, वसई-विरार परिसरात रस्ते जलमय झाले आहेत.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत संततधार सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसामुळे धरणांची आणि नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पंचगंगा नदीची पातळी ३१ फूट एक इंचांवर पोहोचली आहे, तसेच ५६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
५ जुलै – पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, कोकणातील काही जिल्ह्यांना हाय अलर्ट
६-७ जुलै -पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट
८-९ जुलै – सातारा, रत्नागिरी, गोंदिया व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर यलो व ऑरेंज अलर्ट