हवेलीचे उप भूमिअधिक्षक यांच्याकडून जमीन मोजणीसाठी ५० लाख रुपये लाचेची मागणी! पैसे दिले नाही म्हणून जमिनीवर ‘हेलिकॉप्टर शॉट’ लावण्याची धमकी; अमरसिंह पाटीलवर गुन्हा दाखल…

उरुळीकांचन : हवेलीचे उपभूमिअधिक्षक अमरसिंह पाटील यांच्या विभागीय चौकशीचा कारवाईचा अहवाल प्रलंबित असताना या लाचखोर अधिकाऱ्याने एका व्यावसायिकाच्या फी भरुन रीतसर मोजणीसाठी केलेल्या अर्जावर ५० लाख लाचेची मागणी करुन पैसे दिले नाही म्हणून’जमीनीचा हेलिकॉप्टर शॉट’करण्याची कार्यालयीन भूकरमापकाद्वारे धमकी देऊन जमीनदारकाचे चुकीची ‘क’ प्रत तयार करुन अर्थिक नुकसानीला भाग पाडल्याबद्दल सबळ पुराव्याने गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कुणाल चंद्रशेखर अष्टेकर( वय- 41 वर्ष, रा. 1026/28 अ, मनोजचंद्र, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर )यांनी पोलिसांत तक्रार दिली असून सदर तक्रारीनुसार हवेलीचे उप अधिक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील व भुकरमापक, भुमी अभिलेख, हवेली किरण येटाळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार कुणाल अष्टेकर यांनी हडपसर, पुणे येथील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 ची मिळकतीची सन 2023 व सन 2024 मध्ये भुमीअभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांचेकडुन शासकीय फी भरुन कायदेशीर रितसर पद्धतीने मोजणी करुन घेतली होती परंतु सदर जागेच्या मोजणीनंतर हद्द निश्चिती करण्यासाठी जुन 2024 रोजी आरोपी अमरसिंह पाटील, उप-अधीक्षक, भुमी अभिलेख, पुणे व भुकरमापक किरण येटाळे यांनी फिर्यादीकडे 50 लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर आरोपी किरण येटाळे याने सदर रकमेमध्ये सवलत देतो असे सांगुन 25 लाख रुपयांची मागणी करुन, सदर रक्कम दिली नाही तर अमरसिंह पाटील, उप-अधीक्षक, भुमी अभिलेख, पुणे हे हेलीकॉप्टर शॉट लावतील असे बोलुन मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी देवुन अर्जदारांवर पैसे देण्यासाठी दबाव टाकला.
दरम्यान तक्रारदार कुणाल अष्टेकर यांनी उप अधिक्षक हवेली अमरसिंग पाटील यांनी मागितलेली रक्कम न दिल्याने, त्यांच्या जमिन लगतधारकांची चुकीची ‘क’ प्रत तयार करुन मोठे नुकसान केल्याचे उघड झाल्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हवेलीचे उप अधिक्षक अमरसिंह पाटील यांच्या कार्यालयीन कामकाजाची विभागीय चौकशी सुरू आहे.
त्यासाठी चौकशी समितीचा अहवाल प्रतिक्षेत आहे. त्यांच्याकडून पदाचा कार्यभार काढण्यात आला आहे. अशीच पध्दतीची कारवाई जिल्हा भूमि अधिक्षक सुर्यकांत मोरे यांच्यावर सुरू असताना मात्र शासनाने त्यांना चौकशी चालू असताना उपसंचालक भूमि अभिलेख ( जमिन एकत्रिकरण ) या पदावर बढती केली आहे.त्यामुळे हे सर्व प्रकरण ताजे असताना अमरसिंह पाटील यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद होऊन राज्य शासन या अधिकाऱ्यांवर काय कारवाई म्हणून लक्ष लागून असणार आहे.