ताटात मटण-मच्छी असेल तर ताडदेवमध्ये घर बंद? एजंटच्या एका व्हिडीओने मुंबईत नवा वाद पेटला!


मुंबई : मुंबईत घर शोधताना नागरिकांच्या खाण्याच्या सवयींवरून निर्णय घेतला जात असल्याचा आरोप पुन्हा चर्चेत आला आहे. ताडदेव परिसरातील एका इस्टेट एजंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये इस्टेट एजंट भावेश कावरे हा ताडदेवमधील घराची माहिती देताना, मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नसल्याचे, तर शाकाहारी व्यक्तींना घर मिळू शकते, असे सांगताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या व्हिडीओमुळे मुंबईतील घरांच्या व्यवहारात अन्नाच्या निवडीवरून होणारा कथित भेदभाव पुन्हा ऐरणीवर आला आहे. एखादी व्यक्ती मच्छी, मटण किंवा चिकन खाते म्हणून तिला घर नाकारणे कितपत योग्य, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. मुंबईची ओळखच विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि खाद्यपरंपरांच्या संगमाची असताना अशा प्रकारच्या अटी लावल्या जात असतील, तर त्यावर गंभीर चर्चा होण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर अनेकांनी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या घराच्या हक्काचा आणि वैयक्तिक जीवनशैलीचा मुद्दा उपस्थित केला आहे. “मुंबईत कोण काय खावे, हे ठरवण्याचा अधिकार दुसऱ्याला कोणी दिला?” असा सवाल करत सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला. काहींनी हा प्रकार केवळ घर नाकारण्यापुरता मर्यादित नसून सामाजिक भेदभावाच्या मानसिकतेचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

याआधीही मुंबईतील घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवली यांसारख्या परिसरात मराठी भाषिक किंवा मांसाहारी नागरिकांना घर देण्यास नकार दिल्याच्या घटना चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे ताडदेवमधील कथित प्रकारामुळे घर भाड्याने देताना किंवा विकताना नागरिकांच्या भाषा, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीचा विचार केला जातो का, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची पार्श्वभूमी आणि त्यातील वक्तव्याचा नेमका संदर्भ काय आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे व्हिडीओतील दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणेही महत्त्वाचे आहे. मात्र, या घटनेमुळे “मुंबईत घर मिळण्यासाठी ताटात काय आहे, हेही पाहिले जाणार का?” हा सवाल जोरदारपणे चर्चेत आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!