हवेली तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात खालून सहाव्या क्रमांकावर..

लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमीक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत शिरूर तालुका अव्वल ठरला असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर संपूर्ण जिल्ह्यातील १३ तालुक्यांत हवेली तालुका गुणवत्ता यादीत खालून सहाव्या क्रमांकावर आहे. यावरून हवेली तालुक्यातील शाळांची गुणवत्ता खालावल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हवेली तालुक्यातून ४ हजार ४२५ विद्यार्थ्यी बसले होते. त्यापैकी ८०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल. त्यातील फक्त २९ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. तब्बल ३३८० विद्यार्थी परीक्षेत अपात्र ठरले आहेत. पूर्व प्राथमिक (पाचवीच्या) शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत परंपरेप्रमाणे शिरूर, खेड आणि आंबेगाव हे तालुके यावर्षीही अव्वल ठरले आहेत.
माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी सुसज्ज इमारती, सर्व प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा, पोषक शैक्षणिक वातावरण असतानाही हवेलीत शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात प्राथमिक विभाग तोंडावर आपटल्याचे चित्र आहे. ही एक दुर्दैवी बाब नसून हवेली तालुक्याची शैक्षणिक क्षेत्रातील पिछेहाट मानली जात आहे. हे केवळ विद्यार्थ्यांचे अपयश नसून, हवेली तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची पिछेहाट असल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तालुका गुणवत्ता यादीत शेवटून सहाव्या क्रमांकावर ही बाब हवेली तालुक्यातील राजकारणी, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या नावाखाली गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांसाठी लाजिरवाणी आहे. सोशल मीडियापासुन थेट गावातील पारावर राजकारण, अर्थकारणाबरोबरच गप्पा झोडणाऱ्यांनी, राजकारण, अर्थकारणाबरोबरच आपआपल्या गावातील शैक्षणिक प्रगतीवर गप्पा झोडण्याची व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, तेवढ्याच ताकदीचे शिक्षक असतानाही शाळांची पिछेहाट का? असा यक्षप्रश्न नागरिकांना सतावत आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहेत. बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचे असून, काही अपवाद वगळता विद्यालये व इंग्रजी माध्यमांच्या शाळांची पिछेहाट झाली आहे. दरम्यान, गुणवत्ता इतकी का घसरली, हे शोधावे लागणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे हवेली तालुक्यातील शिक्षण पद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गटशिक्षण अधिकाऱ्यांपासुन थेट जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी शाळांना अचानक भेटी देऊन, कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याची गरज असताना अधिकारी मात्र ‘आपले भले व आपले कार्यालय भले’ अशा अवस्थेत काम करत आहेत. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. कामचुकार शिक्षकांवर कोणतीच कारवाईची केली जात नसल्याने शिक्षक शाळेच्या वेळेत फिरत असल्याचे चित्र हवेली तालुका पाहायला मिळत आहे.