Haveli : हवेलीतील ‘यशवंत’वर नतदृष्ट नकोच! बिनविरोध प्रक्रियेत उमेदवार निवडीचे निष्कर्ष लागणार काय…!!

जयदिप जाधव
उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला आता अंतिम वेग आला आहे.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा मंगळवार (दि.२७ ) पूर्वी निवडणूक बिनविरोध करण्याचा दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. संस्थेचे हित व निवडणूकीमुळे संस्थेच्या नव्याने पायाभरणीस आडथळा नको म्हणून संस्थेच्या जुन्या व नव्या मंडळींनी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सकारात्मक प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या सर्व प्रयत्नांत संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही बाब स्वागताहर्य आहे. मात्र संस्थेच्या बिनविरोध निवडणूकीत संस्थेला भविष्यात नख लागेल असे नतदृष्ट संचालक मंडळात नकोत असा सूर सभासद वर्गातून पुढे येत आहे.
हवेली तालुक्यातील बाजार समिती व यशवंत कारखाना या संस्थांना संचालक मंडळाची बरखास्तीची मोहोर अनुक्रमे तब्बल २३ वर्षे व १३ वर्षानंतर उठली आहे. या संस्थांवर यापूर्वी झालेला कारभाराने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अपरीमित नुकसान केले आहे. कारभाऱ्यांच्या चुका शेतकऱ्यांना कशा देशोधडीला लावण्यास भाग पाडायला लावते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हवेली तालुका आहे. या सर्व कारभारातील चुका तालुका भोगत असल्याने आता तरीतालुक्यातील सहकारातील कामकाजात सुधारणा होईल का अशी अपेक्षा तालुक्यातून होत आहे.
हवेली तालुक्याला एकेकाळी नावारुपाला दिलेल्या या संस्था तालुक्याच्या अधिपत्याखाली येऊन तालुक्यातील शेतक- ऱ्यांचा उत्कर्ष व्हावा म्हणून या संस्थेचे पुढील भवितव्य महत्त्वाचे आहे. अशावेळी तालुक्याला न्यायालयातून संस्था पुन्हा उभारणीची मिळालेल्या संधीचे तालुका सोने करणार का? पुन्हा हवेदावे करुन मिळालेल्या संधीची माती करणार म्हणून तालुक्यात या संस्थेच्या निवडणूकीचा निमित्ताने चर्चांना ऊत आला आहे.
या संस्थेच्या निवडणुकीत तालुका नेतेमंडळींचे बदलणारे रंग काही अंशी मात्र बिनविरोध निवडणुकीकडे संस्थेच्या हिताकडे लागले असल्याने संस्थेच्या पडझडीच्या काळानंतर देर आये दुरूस्त आये अशी भावना सद्यातरी तालुक्यात असली तरी तालुक्यातील यापूर्वी चा अनुभव पाहता स्वच्छ व निष्कलंक संचालक मंडळ संस्थेला कामकाजाला मिळणार का म्हणून तालुक्यातील स्वप्न पहावे लागणार आहे.
टक्केवारीत अडकलेल्या उमेदवारांना संधी नको..!
हवेली तालुक्यातील सहकारी संस्थांप्रमाणे तालुक्यातील इतर संस्थेचा कारभार काही वेगळा नसल्याने प्राथमिक चित्र तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीपासून सोसायट्या , पतसंस्था या संस्थांच्या कामकाजाचे चित्र अत्यंत गढूळ आहे. बोटावर मोजता येईल अशा संस्था व ग्रामपंचायतीचा कारभार उत्तम आहे. अनेक ग्रामपंचायती उत्पन्नाचे साधन अशी आवस्था तयार होऊन बसली आहे. त्यामु ळे उमेदवारांची पार्श्वभूमी पाहून टक्केवारी नसलेल्यांचा हाती कारखान्याची उमेदवारी अथवा बिनविरोध निवडणूक दोर देणे संस्थेच्या हिताचे ठरणार आहे.