Hasan Mushrif : पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Hasan Mushrif : पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
ससून रुग्णालयाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, यशोमती ठाकूर, अनिल देशमुख, विश्वजित कदम, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माधुरी मिसाळ यांनी भाग घेतला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ससून रुग्णालयात बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवजात बालकांवरील उपचारांसाठी डॉक्टरांची संख्या पुरेशी असून उपचारांसाठी अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ससूनमधील सुविधा व सद्य:स्थितीबाबत पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रूग्णालयाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही एमपीएससीमार्फत करण्यात येत आहे. गट ‘क’ मधील सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत. गट ‘ड’ पदाची रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात स्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहे. Hasan Mushrif
वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयांमध्ये औषधे खरेदीचे अधिकार अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तातडीने औषधांची गरज असल्यास स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येत आहेत. औषधे नसल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने तक्रार करावी. ससूनमध्ये मागील काळात घडलेल्या गुन्ह्यांबाबत आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली आहे. या रुग्णालयात डायलिसीसची व्यवस्था करण्याबाबत पडताळणी करण्यात येईल. यकृत बदल उपचाराची व्यवस्था मुंबईत असून पुण्यातही शासकीय रुग्णालयातही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे.