हर हर महादेव! केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, आजपासून यात्रेला सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी..

केदारनाथ यात्रेला आजपासून सुरूवात झाली असून त्यासाठी देशभरातले भक्त दाखल झालेत. बाबा केदारनाथाचे दरवाजे हे सहा महिने दर्शनासाठी बंद असतात. त्यानंतरचे सहा महिले हे दरवाजे पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले केले जातात. सध्या वातावरण ठीक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गर्दी होत आहे.
आज सकाळी ७ वाजता बाबा केदारचे दरवाजे भक्तांसाठी पूर्ण विधीपूर्वक उघडण्यात आले. दरवाजे उघडण्याच्या निमित्तानं केदारनाथ धाममध्ये 15 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते. मंदिरात आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.
यावेळी केदारनाथ मंदिराला 108 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातून बाबांची पालखी केदारनाथकडं रवाना झाली असताना हजारो भाविकही पालखीसोबत चालत केदारनाथला पोहोचले. गुरुवारी सायंकाळी बाबा केदार यांची पंचमुखी चल विग्रह उत्सव डोली केदारनाथ धाममध्ये पोहोचली होती.
केदारनाथ धाममध्ये पोहोचल्यानंतर बाबांची पालखी भांडारात ठेवण्यात आली. आज सकाळी हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ मंदिरावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसंच भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकानंही यावेळी वादन केलं. यावेळी भाविकांनी देवाचा जयजयकार केला.
आता बद्रीनाथ धामचे दरवाजे ४ मे रोजी उघडणार आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील, तेव्हा चारधाम यात्रा पूर्णपणे सुरू होईल. उत्तराखंडची ही चारधाम यात्रा पुढील ६ महिने सुरू राहणार आहे. यामुळे सुरक्षा देखील असणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चारधाम यात्रा पूर्ण होते. ६ महिने या धामांचे दरवाजे बंद राहतात.
यमुनोत्री आणि गंगोत्री धामांचे दरवाजे ३० एप्रिल रोजी उघडले आहेत. केदारनाथला जाणारा रोड व्यवस्थित करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केदारनाथ यात्रेसाठी कडेकोड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतीचं सावट असतानाही भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत दहशतवाद्यांना चपराक लगावली आहे.