‘सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी’!! पुण्यात कलमाडी यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष, नेमकं काय घडलं?

पुणे : २०१० साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातील कथित भ्रष्टाचार आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रकुल स्पर्धा आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत आणि इतरांवर अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होते.
असे असताना आता सुरेश कलमाडी यांना दिल्ली न्यायालयाने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. या निर्णयानंतर पुण्यातील त्यांच्या समर्थकांनी एरंडवणे येथील ‘कलमाडी हाऊस’ समोर जमून मोठा जल्लोष साजरा केला. याप्रकरणी ईडीने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दिल्लीतील विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी स्वीकारला.
यामुळे एकेकाळी राज्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या या घरासमोर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजी पाहायला मिळाली. सीबीआयने यापूर्वीच भ्रष्टाचाराचा खटला बंद केला होता, त्यानंतर आता ईडीच्या अहवालालाही न्यायालयाने मान्यता दिल्याने कलमाडींना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत बातमी समजताच पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कलमाडी हाऊसबाहेर एकत्र येऊन आनंद साजरा केला. ‘सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. सध्या कलमाडी सक्रिय राजकारणापासून लांब आहेत.
एकेकाळी पुणे शहरात कलमाडी यांचे मोठं वर्चस्व होत. सुरुवातीला ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि १९८२ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. ते सलग ३० वर्षे खासदार होते आणि पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्री म्हणूनही काम पाहिले.
दरम्यान, गेल्या पंधरा वर्षांपासून कलमाडींविरोधात कोणतेही पुरावे सरकारला सापडले नाहीत, असा दावा कार्यकर्त्यांनी केला, सध्या पुण्यात काँग्रेसची मोठी पडझड झाली आहे. कलमाडी यांच्या काळात पुण्यात काँग्रेसचे अनेक आमदार होते.