उद्धव ठाकरेंच्या गोटात पुन्हा फूट पडणार? शिंदेंचं ‘मिशन टायगर’ सक्रिय; ४ नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी


मुंबई : मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापौरपदाच्या सव्वा-सव्वा वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार पुढील टप्प्यात शिंदे गटाला महापौरपद मिळू शकतं.

महापौरपदाचा दावा मजबूत करण्यासाठी शिंदे गटाकडून संख्याबळ वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. यासाठी पक्षाने विशेष रणनीती आखली असून, चार प्रमुख नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला?

मुंबई महापालिकेत अडीच वर्षांसाठी शिंदे गटाचा महापौर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीमध्ये महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यानंतर पुढील सव्वा वर्ष शिंदे गटाला महापौरपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालिका निवडणुकीनंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत भाजपकडून शिंदे गटाला महापौरपदाबाबत शब्द देण्यात आल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाचा महापौर बसवण्याच्या हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे.

शिंदे गटाचं ‘मिशन टायगर’ सक्रिय?

महापौरपदासाठी आवश्यक संख्याबळ उभं करण्याच्या उद्देशाने शिंदे गटाचं ‘ऑपरेशन मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मिशनची जबाबदारी चार नेत्यांवर सोपवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

निलेश राणे, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे आणि योगेश कदम या चार नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना याबाबत फोन करून सूचना देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

ठाकरे गटातील नगरसेवकांवर शिंदे गटाचा डोळा?

महापौरपदाचा दावा मजबूत करण्यासाठी ठाकरे गटातील काही नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा आहे. सध्या भाजपकडे ८८, तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडे ६४ नगरसेवक आहेत.

त्यामुळे ठाकरे गटातील नगरसेवकांना आपल्या गोटात आणून संख्याबळ वाढवण्यावर शिंदे गटाचा भर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील काही मतदारसंघ ठाकरे गटाचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. या भागातील नगरसेवकांमध्ये फूट पडल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.

मात्र, महापौरपदाचा फॉर्म्युला आणि ‘मिशन टायगर’बाबतची ही माहिती सध्या सूत्रांच्या हवाल्याने समोर आली असून, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!