मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! ओबीसींसारख्या शिष्यवृत्ती, फी सवलतींसह ‘या’ शैक्षणिक लाभांचा मिळणार फायदा


मुंबई : राज्यातील मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती आणि सुविधा आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचाही लाभ उपलब्ध होणार आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित विविध खर्चांच्या प्रतिपूर्तीसाठी असलेल्या योजनांमध्येही मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्याबाहेरील अनुदानित आणि विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांमध्येही मराठा समाजाला समाविष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या अभ्यासक्रमांसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळत होते, त्याच सवलती आता मराठा विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहेत.

तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सवलतींचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक पाठबळ मिळणार आहे.

सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ओबीसी प्रवर्गासाठी सध्या लागू असलेल्या तसेच भविष्यात लागू होणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजालाही आपोआप लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयाचे स्वागत करत मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केल्याचे म्हटले आहे. मराठा समाजाबाबत सरकारविरोधात चुकीचा प्रचार करण्यात आला होता, मात्र या निर्णयामुळे सरकारची भूमिका स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!