शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! मिरज–दिल्ली किसान रेलला हिरवा कंदील; अवघ्या 36 तासांत राजधानीत पोहोचणार शेतमाल

सांगली : सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. फळे, भाजीपाला, फुले आणि इतर नाशिवंत कृषी उत्पादनांची देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत जलद, सुरक्षित आणि कमी खर्चात वाहतूक करण्यासाठी प्रस्तावित मिरज–दिल्ली किसान रेल सेवेला रेल्वे प्रशासनाने अखेर मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या शेतमालाला देशाची प्रमुख बाजारपेठ सहज उपलब्ध होणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनुसार 15 डब्यांची किसान रेल दर शनिवारी दुपारी 4 वाजता मिरज स्थानकातून दिल्लीकडे रवाना होणार आहे. ही रेल्वे पंढरपूर–कुर्डूवाडी मार्गे धावत अवघ्या 36 तासांत दिल्लीत पोहोचणार आहे. त्यामुळे नाशिवंत कृषी उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवत ती देशाच्या राजधानीतील तसेच उत्तर भारतातील मोठ्या बाजारपेठांमध्ये वेळेत पोहोचवणे शक्य होणार आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, फळे, फुले आणि इतर कृषी उत्पादने घेतली जातात. मात्र, ही उत्पादने दूरच्या बाजारपेठेत पोहोचवताना वाहतूक खर्च, वेळ आणि शीतसाखळीच्या सुविधांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा बाजारपेठेत पोहोचण्यास विलंब झाल्याने शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत होता. किसान रेल सुरू झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, वाहतूक खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यासाठी सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शासन आणि रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मिरज येथूनच किसान रेल सुरू व्हावी, अशी प्रशासनाची भूमिका होती. यामागे केवळ रेल्वे सेवा सुरू करण्याचा हेतू नसून, मिरज–सांगली परिसराला कृषी लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याची व्यापक संकल्पना होती.

या प्रकल्पामुळे भविष्यात मिरज परिसरात शीतगृहे (Cold Storage), पॅक हाऊस, वेअरहाऊस, कृषी प्रक्रिया उद्योग, लॉजिस्टिक पार्क आणि वाहतूक व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, तसेच कृषीपूरक उद्योगांनाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वाहतूक दराबाबतही शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बाब समोर आली आहे. सध्या मिरज–दिल्ली किसान रेलचा वाहतूक दर 4 रुपये 50 पैसे प्रति किलो निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या दरावर 50 टक्के अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनुदानाला मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांना केवळ 2 रुपये 25 पैसे प्रति किलो या परवडणाऱ्या दरात शेतमाल दिल्लीपर्यंत पाठवता येणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
मिरज–दिल्ली किसान रेल सेवेला मिळालेली मान्यता ही केवळ नवीन रेल्वे सेवा सुरू होण्यापुरती मर्यादित नसून, पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. रेल्वे प्रशासन, कृषी विभाग, शेतकरी संघटना, व्यापारी आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रत्यक्षात येत आहे. आगामी काळात ही किसान रेल सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल आणि कृषी विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.