शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! आता शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ…

मुंबई : राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. घरकूल लाभार्थी आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी, शेततळे तयार करण्यासाठी किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी माती आणि खडीची गरज असते. यासाठी पैसेही खर्च करावे लागतात.
असे असताना आता हीच माती आणि खडी म्हणजेच गौण खनिज रॉयल्टी फ्री मिळणार आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही योजनेतून गावतळी, शेततळी, शेतविहीरी, पाझरतलाव, बंधारे बांधकाम, लघुसिंचन तलावांचे खोलाकरण, खोलीकरण योजनेंतर्गत निघणारी माती, दगड, मुरुम या गौण खनिजांना शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
महसूल विभागाने याबाबत निर्णय घेतला असून शासन निर्णय जारी केला आहे. राज्यात गावतळी, पाझरतलाव, बंधाऱ्यातील गाळ आणि माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तर त्यांना रॉयल्टी आणि अर्जफ फी आकारू नये. शेतकऱ्यांना स्वखर्चाने गाळ, माती घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, असा हा निर्णय आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे.
तसेच महामार्गांएवढेच शेत पाणंद रस्ते सुद्धा महत्वाचे आहेत. त्यामुळे पाणंद रस्ते तयार करण्यावर सरकारचा भर आहे. यासाठी शेतकऱ्यांना मदतही केली जाते. आता सरकारने निर्णय घेत शेतकऱ्यांचे काम आणखी सोपे केले आहे. याबाबत अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती.
दरम्यान, माती आणि खडी म्हणजेच गौण खनिज रॉयल्टी फ्री मिळणार आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. याबाबतचे आदेश देखील प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे मार्गी लागणार आहेत.