खरेदी केलेल्या जागेच्या सातबाऱ्यावर नाव लावायचे? काय असते संपूर्ण प्रक्रिया, वाचा सविस्तर

पुणे : जमीन किंवा जागेची खरेदी केल्यानंतर केवळ खरेदीखत नोंदणी करून काम पूर्ण होत नाही. खरेदीदाराचे नाव अधिकृतपणे सातबाऱ्यावर येण्यासाठी फेरफार प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. अनेकांना खरेदीखत झाल्यानंतर पुढे काय करावे, कोणती कागदपत्रे लागतात आणि सातबाऱ्यावर नाव किती दिवसांत लागते याची माहिती नसते. त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सब-रजिस्ट्रार कार्यालयात खरेदीखताची नोंदणी झाल्यानंतर संबंधित व्यवहाराची माहिती महसूल विभागाकडे पाठवली जाते. त्यानंतर ‘ई-फेरफार’ किंवा ‘आपली चावडी’ प्रणालीद्वारे फेरफार प्रक्रिया सुरू होते.
कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी नोंदणीकृत खरेदीखताची प्रत, इंडेक्स-२, नवीनतम सातबारा उतारा, खरेदीदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक असते. शेतजमिनीच्या बाबतीत शेतकरी असल्याचा पुरावा किंवा शेतकरी प्रमाणपत्रही सादर करावे लागते.

फेरफार प्रक्रिया कशी होते?
खरेदीखत झाल्यानंतर संबंधित तलाठी कार्यालयात किंवा मंडल अधिकाऱ्यांकडे फेरफार अर्ज सादर केला जातो. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठी गावाच्या चावडीवर किंवा ऑनलाइन प्रणालीवर नोटीस प्रसिद्ध करतात.
ही नोटीस साधारणपणे १५ दिवसांसाठी असते. या कालावधीत संबंधित व्यवहाराबाबत कोणाला हरकत असल्यास ती नोंदवता येते. मुदतीत कोणतीही हरकत न आल्यास मंडल अधिकारी फेरफार मंजूर करतात.
सातबाऱ्यावर नाव किती दिवसांत लागते?
फेरफार मंजूर झाल्यानंतर तलाठी सातबाऱ्यावरील नोंदी अद्ययावत करतात आणि नवीन खरेदीदाराचे नाव नोंदवले जाते. कोणतीही हरकत नसल्यास साधारणपणे ३० दिवसांच्या आत सातबाऱ्यावर नवीन मालकाचे नाव दिसू लागते.
महसूल तज्ज्ञांच्या मते, जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर नाव लागले आहे की नाही, याची नियमित पडताळणी करणे आवश्यक आहे. फेरफार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खरेदीदाराचा मालकी हक्क महसूल अभिलेखांमध्ये अधिकृतपणे नोंदवला जातो.